विकासकामे केल्याने बारणे यांनी हक्काने मागितली आदिवासींकडेही मते
कर्जत ः कर्जत तालुक्यातील प्रचार दौऱ्यात मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी कर्जत शहरापासून अगदी दुर्गम भागातील आदिवासी वाड्या-वस्त्यांपर्यंत मतदारांशी संपर्क साधला. ‘माझा भाव आला’ असं म्हणत स्वतःच्या हातांनी बनवलेला रान फुलांचा गुच्छ देत आदिवासी भगिनी त्यांचे स्वागत केले. विकास कामे केल्यामुळे बारणे यांनी आदिवासी बांधवांकडेही हक्काने मागितली.
खासदार बारणे यांनी कर्जत तालुक्यातील पळसदरी, भिसेगाव, चारफाटा, श्रीराम पूल, दहिवली, खांडपे, कोंदिवडे, चोचीवाडी, बीड, मोहिली, धाकटे वेणगाव, जांभिवली, कडाव, कशेळे, पाथरज, खांडस, नांदगाव, बलीवरे, ओलमन, कोळंब, पोशीर, नेरळ, डिकसळ, किरवली आदी गावांचा प्रचार दौरा केला.
कर्जतच्या प्रचार दौऱ्यात बारणे यांच्या समवेत आमदार महेंद्र थोरवे, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भोईर, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शिल्पाताई देशमुख, तालुका प्रमुख संभाजी जगताप, मनोहर थोरवे, भाजपचे प्रचार प्रमुख किरण ठाकरे, तालुकाध्यक्ष राजेश भगत, सरचिटणीस दीपक बेहरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोक भोपतराव, कर्जत शहराध्यक्ष भगवान भोईर, रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे तालुकाध्यक्ष हिरामण गायकवाड आदी पदाधिकारी होते.
बारणे यांनी कर्जत तालुक्यातील आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. अत्यंत दुर्गम अशा आदिवासी पाड्यांपर्यंत रस्ते, विकास वीज, पाणी अशा मूलभूत सुविधा पोहोचविण्याचे काम केले आहे. या भागात त्यांचे तेवढ्याच प्रेमाने स्वागत होताना दिसत होते.
‘माझा भाव आला, माझा भाव आला’
ओलमन या गावात ‘माझा भाव आला, माझा भाव आला’, असे म्हणत आदिवासी भगिनींनी मोठ्या आपुलकीने आप्पांचे स्वागत केले. स्वतःच्या हातांनी बनवलेला रानफुलांचा गुच्छ देत प्रेमाने ओवाळले. या स्वागताने आप्पा भारावून गेले. ‘मी पण तेवढ्याच हक्कानं मतं मागायला आलो आहे,’ असे म्हणत आप्पांनी त्यांना मतदानाचे आवाहन केले.
हापूस आंब्यांचा हार घालून स्वागत
श्रीरंग आप्पांचे ठिकाणी प्रेमाने स्वागत होत होते. एका गावात तर त्यांच्या चाहत्यांनी त्यांना कोकणच्या हापूस आंब्यांचा हार घातला.
कर्जत शहरात प्रचारफेरी
तालुक्यात दिवसभर प्रचार दौरा केल्यानंतर कर्जत शहरात महायुतीच्या वतीने भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचार फेरीच्या निमित्ताने महायुतीने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. तरुण कार्यकर्ते दुचाकीवर महायुतीतील घटक पक्षांचे झेंडे घेऊन रॅलीत सहभागी झाले होते. खासदार बारणे यांनी रॅली मार्गाच्या दुतर्फा उभ्या असलेल्या मतदारांना अभिवादन करून धनुष्यबाणाला मतदान करण्याचे आवाहन केले.