उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मावळ येथे सभा पार पडली. महायुतीचे मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने अजित पवार यांची आज मावळ येथे सभा पार पडली. या निवडणुकीत अजित पवारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा आतून प्रचार करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम दिला. मावळ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजोग वाघेरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तर महायुतीकडून शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देण्यात आलीय. त्यामुळे दोन्ही शिवसेनेच्या गटाच्या उमेदवारांमध्ये ही काँटे की टक्कर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी अजित पवारांनी आज कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी अजित पवारांनी महत्त्वाच्या सूचना केल्या.
“मावळकरांनो निवडणूक महत्वाची आहे. नात्या-गोत्याचे आणि राजकारण याचा विचार करू नका. नातेवाईकांना म्हणावं या 13 तारखेला मतदान होणार आहे. 14 तारखेला या. जेवण घालतो, पोशाख करतो, हवं फार तर रुसू नये म्हणून अंगठी घालतो. या पद्धतीने सांगा आणि आता कोणाला घरी बोलावू नका”, असं अजित पवार यांनी आपल्या शैलीत आवाहन केलं.
‘गडबड केली तर त्याचं कामचं करून टाकेन’
“खालची टीम जरा गडबड करत आहे, माझं लक्ष आहे. सुनील शेळके बोलला आहे. जर गडबड केली तर त्याचं कामचं करून टाकेन. तेव्हा खालच्या कार्यकर्त्यांनी कोणती गडबड करू नये. आपला उमेदवार हे श्रीरंग बारणेचं आहेत. लक्षात ठेवा”, असं अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना बजावलं.